औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनात काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणबाजी केली. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी यावर जोरदार हल्ला चढविला आहे.
‘एमआयएम ही संघटना छत्रपती संभाजीनगर नावाविरोधात आंदोलन करते. आम्ही वारंवार सांगतो, की या एमआयमचा औरंगजेब कोण लागतो ? ही एमआयएम औरंगजेबाच्या विचाराला मानते का? असे परखड सवाल दानवे यांनी उपस्थित केले .बाळासाहेब ठाकरेंनी जिल्ह्यातील जनतेची भावना लक्ष्यात घेऊन नामांतर करावे अशी भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या शहराचे नामांतर केले, त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचे केंद्र सरकारकडून मान्यता दिली आहे. त्यांचे सर्व जिल्ह्यातील लोकांनी स्वागत केले आहे. मात्र, एमआयएमकडून शहरात जातीयवाद पसरवला जातोय असा आरोप दानवे यांनी केला आहे. एमआयएमला उत्तर देण्यासाठी आम्ही शिवसेना म्हणून सक्षम असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
