ठाणे महापालिकेने केलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज करण्यात आले. हा ठाणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वागळे इस्टेटमधील लोकार्पण सोहळ्यात काढले. मुंबईप्रमाणेच ठाणेदेखील आंतराष्ट्रीय शहर करण्यासाठी राज्य शासनाकडून लागेल ती मदत देण्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा ज्या गावदेवी मैदानात झाली ते मैदान सुरक्षित ठेवून तेथे चांगली पार्किंग सुविधा तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर, कळवा रुग्णालयातील सुविधांचा ठाणेकरांना फायदा होईल. इलेक्ट्रिक बसेस या ठाणे प्रदूषणमुक्त करण्याची पहिली पायरी आहेत. वागळे इस्टेटमधली वाहतूक बेट तर सेल्फी पॉइंट झाले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
ठाण्याच्या इतिहासात राज्य शासनाने प्रथमच एवढा निधी ठाणे महापालिकेस दिला आहे. त्याचा व्यवस्थित विनियोग केला जावा. लोकांचा पैसा लोकांसाठीच्या सुविधांसाठी खर्च झाला पाहिजे. त्या सुविधा गुणवत्तापूर्ण असाव्यात. रस्ते, प्रकल्प यात दर्जा राखला जात नसेल तर कोणतीही तमा न बाळगता कारवाई करा असे निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले. त्याचवेळी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत त्याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले.
