कोकणातील खेड येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेची राज्यभरात जोरदार चर्चा आहे. या सभेत लाखोंची गर्दी झाली होती. उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे गटावर धारदार टीका केली. तसेच शिवसैनिकांना भावनिक आवाहनही केलं. यावरून कोकणातले बंडखोर नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय. तर नारायण राणे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची काय हालत झाली होती, यावरून रामदास कदम यांनी त्यांना चांगलंच सुनावलंय. तसेच महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घ्यावं हे बाळासाहेब ठाकरे यांना सहन झालं नसतं, याचा पुनरुच्चार रामदास कदम यांनी केला.
“माध्यमांसमोर जाण्यास मला बंदी घालण्यात आली होती. अयोध्येमध्ये जाण्यासाठी उद्धव ठाकरे निघाले होते तेव्हा सगळी व्यवस्था रामदास कदम यांनी केली होती. संजय राऊत यासाठी साक्षीदार आहेत. पण आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मला बोलवून घेतले आणि माझ्यासोबत अयोध्येला यायचं नाही असं सांगितले. मला काही कळले नाही. बाळासाहेब गेल्यानंतर माझ्या सभा बंद करुन टाकल्या. उद्धवजी तुमचा चेहरा भोळा दिसतो. पण त्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेले आहेत याचा मी साक्षीदार आहे. तुमची नस मी ओळखतो,” असे रामदास कदम म्हणाले.
तुमच्या वडिलांच्या विचारांची बेईमानी तुम्हीच केले. त्या वडिलांचे नाव सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? याचे आत्मपरिक्षण करा. हे चोरलं, ते चोरलं मग तू काय करतोय? झोपलाय का? असा संतप्त सवाल कदम यांनी यावेळी ठाकरेंना केला.तसेच, माझा मुलगा योगेश कदमांना संपवण्याचं कटकारस्थान उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना केले गेले. स्थानिक आमदार असताना पक्षातील नेत्यालाच संपवण्याचं काम तुम्ही केले. तुमच्या सगळ्यांना मी १९ तारखेला उत्तर देणार आहे. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
