राज्यात होळी आणि धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले आहे. याचा दुरुपयोग करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच मोरे यांनी लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी खंडणीखोरांनी दिली आहे. ऐन होळीच्या दिवशी अशी घटना घडल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.
वसंत रुपेश मोरे यांच्या व्हाट्सअप मोबाईलवर त्यांच्या मुलासाठी धमकीचा मेसेज आला आहे. ‘अल्फिया शेख या मुलीसोबत विवाह झाले आहे’ असे ग्रामसेवक ग्रामपंचायत वडगाव तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथील बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाठवले आहे.’आम्ही बनावट लग्नाचं प्रमाणपत्र तयार केलं आहे. खराडी आयटी पार्कच्या समोरील वाहनात वीस लाख रुपये द्या, अन्यथा आम्ही तुमच्या अत्याचारासाठी गुन्हा दाखल करू’ असा धमकीचा मेसेज आहे. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक मेसेज आला. ‘मी अल्फिया शेख असून ३० लाख रुपये नाही दिल्यास अत्याचाराची तक्रार करून तुरुंगात पाठवेन. अशा पद्धतीचा मेजेस पाठण्यात आला आहे.
