राज्याच्या कृषी क्षेत्रात 10.2 टक्के वाढीचा अंदाज

मुंबई : राज्याच्या कृषी क्षेत्रात 10.2 टक्के वाढीचा अंदाज 2022-23 च्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तविण्यात आला आहे. खरीप हंगामात 157.97 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. तर रब्बी हंगामात 57.74 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात 10.2 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्यात 10 टक्क्यांची, तेलबियामध्ये 19 टक्क्यांची, तर कापूस 5 टक्के आणि ऊसाच्या उत्पादनात 4 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

सन 2022-23 च्या पुर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्योग क्षेत्रात 6.1 टक्के वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ अपेक्षित आहे. 2022-23 मध्ये स्थूल राज्य उत्पन्न 35 लाख 27 हजार 84 कोटी अपेक्षित आहे.

2022-23 मध्ये राज्यावर 6 लाख 49 हजार 699 कोटी कर्ज अपेक्षित आहे. राज्यावर कर्जाच्या व्याजाचा बोजा 46 हजार कोटी रुपये आहे. 2022-23 मध्ये राज्याच्या एकूण महसुली खर्चात वेतन आणि निवृत्ती वेतन यावर 44.1 टक्के खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, महाराष्ट्र विकासाचा दर देशाच्या विकास दरपेक्षा कमी आहे. राज्याचे एकूण उत्पन्न चार लाख 95 हजार 575 कोटी राहण्याचा अंदाज आहे. राज्याचा खर्च चार लाख 85 हजार 233 कोटी राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या स्थूल उत्पन्नात राज्याचा वाटा सर्वाधिक 14 टक्के आहे.