शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे 13000 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हवी आहे. या संदर्भात राज्य सरकार संबंधितांकडून अहवाल मागवून लवकरात लवकर मदत देईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या स्थगन प्रस्तावाच्या चर्चेवरील मागणी दरम्यान ते बोलत होते.

कुठे झाले नुकसान ? गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमिनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा,‍ लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार : गेले तीन दिवस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आतापर्यंत राज्यात 13 हजाराहून अधिक हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये विविध पिकांचे नुकसान झाले असून त्याबाबतची आकडेवारी हाती घेत आहे. अजून नुकसानीची आकडेवारी येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. यासंदर्भात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार असून शेतकऱ्यांना निश्चितच मदत केली जाईल असे सांगतानाच या प्रश्नाचे कुणीही राजकारण करू नये तुमच्या काळात तुम्ही चक्रीवादळाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे दिले नाहीत याची आठवणही यावेळी फडणवीस यांनी करून दिली.