राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले आहेत. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले. जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे-पिता पुत्राची खेळी यशस्वी झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नगरच्या राजकारणामध्ये पुन्हा दणका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके यांच्या निधनानंतर बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना अध्यक्षपद देण्याचे ठरवले गेले. महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने घुले यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, ऐन वेळेस राज्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांच्या खेळीमुळे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कडले यांचा विजय झाला.
कर्डिले यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव केला. जिल्हा सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विखेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनाधक्का देत आंबादास पिसाळ यांचा विजय घडवून आणला होता. तोच पॅटर्न अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही पाहायला मिळाला आहे.
