नाशिक जिल्हा न्यायालयाच्या सुनावणीवर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया

प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर बच्चू कडू यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने जामीन दिला आहे. सामान्य माणसाने पत्र दिल्यानंतर सात दिवसात उत्तर दिले पाहिजे. एकही उत्तर दिले गेले नाही. कायद्याची ऐशी की तैशी तत्कालीन संबंधित आयुक्तांनी केली. हक्काचा निधी खर्च करत नाही. अधिकार म्हणून केले आणि शिक्षा आम्हाला सुनावली गेली असे बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांग बांधवाच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. अनेकदा तत्कालीन आयुक्तांना पत्र देऊनही आम्हालाही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आंदोलन केले. आम्ही मौजमजा करायला आलो नव्हतो. ज्यांना हात-पाय, डोळे नाहीत, अशा दिव्यांग बांधवांच्या हक्काचा निधी हे अधिकारी खर्च करत नाहीत, म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं. आम्ही आंदोलन केलं म्हणून आम्हाला शिक्षा सुनावली. याउलट आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ का आली? याचा तपास करायला हवा. हे का तपासलं जात नाही? असा सवाल करत बच्चू कडू यांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपथित केले. दरम्यान, सरकारी वकील सचिन बोरवडकर यांनी सांगितले की, 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर बचू कडू यांना तात्पुरता जामीन मिळाला आहे. 24 मे 2017 साली मनपा आयुक्तालयात बचू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत अर्वाच्य भाषेत बोलल्याने व शासकीय कर्मचाऱ्यांना अपमानित केल्याने न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली होती.