मुंबई : विराेधक शेतकऱ्यांच्या बाजुने असते तर मागच्या काळात मदत केली असती. मात्र, त्यांनी काेणतीही मदत केली नाही. त्यांच्या काळातील पैसे आम्हाला द्यावे लागले असे सुनावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मगरीचे अश्रू रडणे थांबवा अशा शब्दांत विराेधकांना सुनावले.
राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर विराेधकांनी विधानसभेत गाेंधळ घातला. यावेळी विराेधकांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, किमान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तरी राजकारण थांबवा. हा राजकारण करण्याचा विषय नाही.
उपमुख्यमंत्री म्हणाले, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मागितली आहे. प्राथमिक माहितीनुसार 8 जिल्ह्यांत सुमारे 13,729 हेक्टरवर नुकसान आहे. आणखी अहवाल येत आहेत. मदतीचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पण आज नुकसान झाले आणि उद्या मदत दिली असे हाेत नाही. त्यासाठी पंचनामे करावे लागतात.
फडणवीस उत्तर देत असताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जयंत पाटील आणि इतरांनी त्यांना राेखण्याचा प्रयत्न केला. यावर त्यांना सुनावताना फडणवीस म्हणाले, मला आता बाेलायला लावू नका. मागच्या काळात चक्रीवादळ आले त्याचे पैसे अजून दिले नाही. कशाला राजकीय बाेलायला लावता. हा राजकीय विषय नाही. त्यांच्या काळातले अनुदानाचे पैसे आम्ही दिले. सुमारे पाच हजार काेटी रुपये आमच्या सरकारने दिले.
