पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत देण्यात येतील, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिले. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सध्याही दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हे पाहता अब्दुल सत्तार म्हणाले की, एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना 2305 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे वाटप विमा कंपन्यांनी केल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना पूर्णपणे मदत करत असल्याचा दावा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून सतत केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सरकार स्थापन होताच राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यात येणार असल्याचा दावा केला होता. पण असे असताना राज्यातील शेतकरी आत्महत्या काही थांबत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातच एकापाठोपाठ शेतकऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे.
