भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर अरुणाचलमध्ये कोसळलं! बेपत्ता वैमानिकांचा शोध सुरू

अरुणाचल प्रदेशातील मांडला हिल परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमधील दोन्ही लष्करी पायलट बेपत्ता आहेत. त्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, ते सेंगे ते मिसमरीकडे उड्डाण करत होते.गुवाहाटीचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी पुष्टी केली की आज सकाळी 9.15 च्या सुमारास चीता हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटला.लेफ्टनंट कर्नला व्ही. व्ही. रेड्डी आणि मेजर जयंत हे या हेलिकॉप्टरचे वैमानिक आहेत. हेलिकॉप्टरचे जळालेले अवशेष सापडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप वैमानिक सापडले नसल्यानं ते सुखरूप असावेत, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ऑक्टोबर महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील तवांग जवळ भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर ‘चित्ता’चा अपघात झाला होता. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला होता. तवांग जिल्ह्यातील जेमीथांग सर्कलच्या बाप टेंग कांग धबधब्याजवळील न्यामजांग चू या ठिकाणी अपघात झाला होता. चित्ता हेलिकॉप्टर सुरवा सांबा भागातून टेहळणीसाठी या भागात येत होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. त्यातील एका पायलटचा मृत्यू झाला होता.