मुंबई : चुकीच्या प्रकरणात मदत करणार नसल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगूनही डिझायनरकडून एक कोटी रुपयांच्या लाचेचे आमिष दाखवून आले. नंबर ब्लॉक करूनही अज्ञात नंबर वरून बॅगेत पैसे भरल्याचा व्हिडीओ पाठविला. या महिलेला धडा शिकविण्यासाठी पोलिसांत तक्रार दिल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम सभागृहात सांगितला. पोलिसांनी संबंधित आरोपीला जाळ्यात अडकवल्यानंतर त्याने या प्रकरणात काही पोलीस अधिकारी आणि नेत्यांची नावही घेतली असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.
एका गुन्हेगारी प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी एका डिझायनरनं थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपये ऑफर केली. अमृता फडणवीस यांच्या सजगतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सभागृहात सविस्तर माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले,या प्रकरणी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये अमृता फडणवीस यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी 20 फेब्रुवारी 2023 रोजी अनिक्षा नावाची डिझायनर आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनिल जयसिंघानी हा व्यक्ती फरार आहे. त्याची मुलगी 2015-2016 मध्ये अमृता फडणवीस यांना भेटली होती. त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या.डिझायनर असल्याचं सांगून तिने अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर आई वारल्याचं सांगून पुस्तक प्रकाशन करून घेतले. विश्वास संपादन केला.
या मुलीने विश्वास संपादन करून डिझायनर कपडे परिधान करण्यास दिले. त्यानंतर वडिलांना काही चुकीच्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा या मुलीने केला. तसेच अमृता फडणवीस यांना निवेदन देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर काही बुकींना आपण ओळख असल्याचंही या मुलीने सांगितलं. या प्रकरणात अमृता यांनी दुर्लक्ष केलं, यामागे काही काळबेरं असल्याचा संशय आल्याने सजग होऊन नंबर ब्लॉक. त्यानंतरही अज्ञात नंबर वरून व्हिडीओ पाठवण्यात आले. ज्यामध्ये एका बॅगेत पैसे भरल्याचा व्हिडीओ व दुसरी बॅग घरकाम करणाऱ्याला महिलेला दिल्याचा व्हिडीओ होता. ही बाब अमृता यांनी मला सांगितल्यानंतर याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी संबंधित आरोपीला जाळ्यात आडकवल्यानंतर त्याने या प्रकरणात काही पोलीस अधिकारी आणि नेत्यांची नावही घेतली असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे.
