भरपावसात मनसेची स्वप्नपूर्ती रॅली; पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज एमआयएम विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात एमआयएम आणि आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील संस्थान गणपतीपासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. पण संस्थान गणपतीपासून काही अंतरावरच हा मोर्चा अडवण्यात आला. या मोर्चाला या आधीच परवानगी नाकारण्यात आली होती. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढण्यावर ठाम होती. अखेर पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला.

मनसे कार्यकर्त्यांच्या रॅलीला अडवल्यामुळे ते आक्रमक झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या रॅलीला तुम्ही परवानगी देता, तर आम्ही शांततेने रॅली काढतो, तर तिला का अडवता, असा सवाल मनसेकडून उपस्थित केला. पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.