राज्याला गारपिटीचा तडाखा! शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

मुंबई : संपूर्ण राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीनं पुन्हा एकदा हजेरी लावल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात शेतीसह आंबा आणि द्राक्ष फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांसह काही दुकानांचेही नुकसान झाले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार राज्यातील नऊ जिल्ह्यांना गारपिटीची तडाखा बसला आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातदेखील वादळी वाऱ्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं.

कलिंगड, मोसंबी, गहू, ज्वारी, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, आंबा, केळी, काजू आणि भाजीपाला या पिकांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बीड, उस्मानाबाद, सोलापूर, जालना, धुळे, नाशिक, नंदूरबार, परभणी जिल्ह्यामध्ये आज गारपिटीसह पाऊस झाला.