मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज गुढीपाडव्यानिमित्त जाहीर सभा घेणार आहेत. या सभेआधी शिवसेनेचं मुख्यालय असणाऱ्या दादरच्या शिवसेनाभवन समोर मनसेच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे या आशयाचा मजकूर आहे. या बॅनरची सध्या चर्चा होतेय. त्यावर ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. ज्याच्याकडे बहुमत असेल तो मुख्यमंत्री होईल. पण बहुमत हे चंचल असतं. आज त्यांच्याकडे बहुमत असेल उद्या आमच्याकडे असेल, असंही राऊत म्हणालेत.तुमच्याकडे बहुमत असेल तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता. शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे. बहुमत नेहमी चंचल असतं. आज आमच्याकडे असेल तर उद्या दुसऱ्याकडे. या देशात लोकशाही आहे. या देशात सामान्य नागरिक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे बहुमताच्या खेळावर कुणी अवलंबून राहू नये असं मत त्यांनी व्यक्त केले.
