गडकरी धमकी प्रकरणातील तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

नागपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. मंगळवारी पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात आता एका तरुणीला मेंगलोर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे. या प्रकरणात नागपुरातल्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याची धमकी तसेच खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही तरुणी बंगळुरू येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते. गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्याने एक नंबर देत या नंबरवर दहा कोटी रुपयांची खंडणी पाठवण्यास सांगितले होते. हा नंबरचा तपास केला असता हा नंबर बंगळूर एका तरुणीचा असल्याचे आढळून आले. तसेच, तिचा एक मित्र कारागृहात असल्याची माहिती तपासात समोर आली. या तरुणीला चौकशीसाठी मेंगलोर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.