पुण्यातील ओशो आश्रमात बेकायदेशीर घुसून धक्काबुक्की केल्याप्रकरणी 100 ते 120 जणांवर कोरेगाव पार्क पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या ओशो आश्रमाच्या ट्रस्टबाबत सध्या अनेक वादविवाद सुरु आहे. आश्रमची विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर ओशो आश्रमाचे अनुयायी आणि वैभव कुमार पाठक यानी विरोध करण्यासाठी आश्रमावर मोर्चा काढला होता. काल या मोर्चेदरम्यान आश्रमात बसून बेकायदेशीररित्या ट्रस्टच्या ट्रस्टीना मारहाण केल्याप्रकरणी वैभव कुमार पाठक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल आश्रमावर काढण्यात आलेल्या मोर्च्याच्यावेळी पोलिसांनी लाठीमार केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला होता.
कोरेगाव पार्क परिसरातील ओशो आश्रमात घडलेल्या या घटनेनंतर आरोपींवर भारतीय दंड विधान संहिता कलम 143, 147, 452 , 323, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रमोद त्रिपाठी ऊर्फ प्रेम पारस, सुनिल मिरपुरी ऊर्फ ऊर्फ स्वामी चैतन्य किर्ती यासह मिडीया प्रतिनिधी वैभवकुमार पाठक व इतर 100 ते 120 अनुयायींवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करणाऱ्या अनुयायांनी बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. पोलिसांनी वारंवार समजूत काढूनही अनुयायी आपल्या मागण्यांवर ठाम होते. ओशो आश्रमाच्या बचावासाठी व्यवस्थापन विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले आहे. या लाठीमारात अनेक अनुयायी गंभीर जखमी झाले आहेत.
