शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आलं असून त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या नियुक्तीचं अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेकडून किर्तीकर संसदेत व्हीप काढू शकतात. म्हणजेच, किर्तीकरांचा व्हीप संजय राऊतांनी न पाळल्यास अपात्रतेची कारवाई देखील होऊ शकते. अपात्रतेची कारवाई झाल्यास राऊतांची खासदारकीही जाऊ शकते. संसदेत शिवसेनेच्या खासदारांचा विचार केला तर लोकसभेत एकूण 18 खासदारांपैकी शिंदेंच्या शिवसेनेसोबत 13 खासदार आहेत. तर ठाकरे गटासोबत 5 खासदार आहेत. राज्यसभेत एकूण 3 खासदार आहेत. तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत.
महिन्याभरापूर्वीच संसदेतील मुख्य नेते पदावरुन राऊतांना हटवण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. संसदेत व्हिप काढण्याचा अधिकार संजय राऊत यांना होता, पण आता गजानन किर्तीकर यांच्याकडं हे सर्व अधिकार असतील. शिंदेंच्या सर्व खासदारांकडून किर्तीकरांचा या नियुक्तीबद्दल सत्कारही करण्यात आला आहे.
