काकांना ईव्हीएमवर शंका आणि पुतण्या म्हणतो ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने विराेधक पुन्हा एकदा  ईव्हीएम वर शंका घेऊ लागले आहेत. यासाठी निवडणूक आयाेगाकडेही जाणार आहेत. मात्र, काका ईव्हीएमवर शंका घेत असताना त्यांचे पुतणे अजित पवार मात्र त्यावर वेगळे मत व्यक्त करत आहेत. निवडून आले की बाेलायचे नाही पण दारुण पराभव हाेऊन डिपाॅझिट जप्त झाले की ईव्हीएम मॅनेज करायचे असा टाेला ते लगावतात. त्यामुळे शरद पवार यांच्या विराेधावर ते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. यासाठी काल दिल्लीतमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी विराेधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये निवडणूक आयाेगाकडे जाण्याचा निर्णयही झाला. मात्र या संदर्भात अजित पवार यांनी वारंवार आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. याबाबत ते म्हणाले हाेते की अनेक वेळा एखाद्या पक्षाला चांगले बहुमत मिळाले की काही शंका नसते. पण दारुण  पराभव झाला, डिपॉझिटच जप्त झाले की म्हणतात मॅनेज केले. ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन भाजप सरकार गेले नसते. यामुळे ईव्हीएमच्या मुद्द्यावर पवार कुटुंबातच संभ्रम असल्याचं समोर येत आहे.