शरद पवार यांना पंतप्रधान करायचे असेल तर तीन वेगळी राज्ये करावी लागतील. एक लवासा, एक बारामती, आणि एक मगरपट्टा. मगरपट्टयाचे मुख्यमंत्री जयंत पाटील, लवासाच्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे आणि बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवार यांना करा. हे तिन्ही राज्य एकत्र करून देश करा आणि त्याचे पंतप्रधान शरद पवारांना करा, असा टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला. इंदापूर येथील सभेत बोलताना पडळकर म्हणाले.
पवार नावाची किड या महाराष्ट्राला लागली आहे. ती मुळापासूनच काढून टाकावी लागावी लागेल. तरच तुम्हाला न्याय मिळेल. राज्यात आणि देशात अनेक वर्षे यांच्याकडे सत्ता होती. मात्र यांना पाणी देता आले नाही. हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. यांना का नाही वाटले दुष्काळी भागात पाणी द्यावे? हे केंद्रीय कृषी मंत्री होते. यांना राज्यात पैसा आणावासा वाटला नाही. मी दुष्काळी तालुक्यातून येतो. तो मतदारसंघ पवारांच्या पाठीशी ठामपमे उभा राहिला. मात्र या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी द्यावे वाटले नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा. पडळकर म्हणाले, 2014 मध्ये भाजपचा तरुणाबांड कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला.
2014 ते 2019 या काळाचा विचार केला तर मराठवाडा, कोकण, खान्देश, विदर्भ असो येथील शेतकऱ्यांचा सारासार विचार करुन शेतकऱ्यांसाठी त्यांनी योग्य ते निर्णय घेतले. देवेंद्र फडणवीस असा नेता आहे जो निष्कलंक आहे. महाराष्ट्रातल्या जनतेशी त्यांची भागीदारी आहे. देवेंद्र फडणवीसांनी जो अर्थसंकल्प मांडला ज्याने अनेक घटकांना मदत केली. मात्र अजित पवारांनी प्रस्थापितांना प्रस्थापित करणारे अर्थसंकल्प मांडले.पाकिस्तानमधील तरुण पोरं म्हणतात आम्हाला मोदी सारखा नेता हवाय. आपण भाग्यवान आहोत मोदींच्या सत्तेत राहतोय. तालिबानी मोदींजींबद्दल काय म्हणत आहे पाहा. भावी पंतप्रधान असा काही विषय असतो का? यांच्यांनंतर मायावती, जयललिता, केजरीवाल मुख्यमंत्री झाले. यांना 100च्या पुढे आकडा नेता येत नाही. पुणे जिल्ह्याने राष्ट्रवादीला हद्दपार करायचे ठरवले आहे, असेही पडळकर म्हणाले.
