राहूल गांधींच्या थाेबाडात देण्याची हिंमत दाखविणार का? मुख्यमंत्र्यांचा उध्दव ठाकरेंना सवाल

मुंबई  : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणाले म्हणजे काय करणार. बाळासाहेबांनी जशी मणिशंकर अय्यर यांच्या थाेबाडीत दिली हाेती.  राहूल गांधींच्या थाेबाडात देऊन ही हिंमत दाखविणार का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना केला आहे. यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात सावरकर गाैरव यात्रा काढण्यात येणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, देशाला स्वातंत्र्य  मिळवून देण्यासाठी सावरकरांनी  काळ्यापाण्याची शिक्षा भाेगली. या देशभक्तांच्या आणि स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून स्वातंत्र्य मिळाले आहे. त्या देशभक्तांचा जाणीवपूर्वक वारंवार अपमान करण्याचा निंदनीय प्रकार दिसत आहे. राहूल गांधी यांनी केवळ एक दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानातील ज्या सेल्यूलर जेलमध्ये हाेते त्यात एक दिवस राहून यावे.


राहूल गांधी यांच्या  कृत्याचा निषेध करावा तेवढा थाेडा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, त्यांचा निषेध सगळ्यांनी करायला हवा हाेता. ते वारंवार सांगतात मी सावरकर नाही. पण सावरकर  हाेण्याची त्यांची लायकीच नाही. त्यांचा त्याग तुमच्याकडे नाही. सावरकर  व्हायला देशाबद्दल प्रेम असायला हवे. या देशाची निंदा तुम्ही परदेशात जाऊन करताय. हा खऱ्या अर्थाने देशद्राेह आहे.


 विधानसभेच्या अधिवेशनात हिंदुत्व हिंदूत्व म्हणणाऱ्या नेत्यांची एकही शब्द राहुल गांधी यांच्या विराेधात काढण्याची हिंमत झाली नाही. त्यांचे आमदार मुग गिळून गप्प हाेते. सगळ्या बाजूंनी भडिमार झाला तेव्हा उशिरा सुचलेले शहाणपण कालच्या सभेत दिसले. पण ते तुमच्या कृतीतून दिसले पाहिजे.