पुण्यातील भाजप नेते खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७२ वर्षांचे होते. खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बापट आजारी होते. दरम्यान गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत.
गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. परंतु त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. बुधवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यांवर डॉक्टरांनी उपचार सुरु केले होते. गिरीश बापट यांनी जवळपास ३० वर्षे कसबा मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर सध्याचे पुणे शहराचे ते विद्यमान खासदार होते. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारा नेता अशी गिरीश बापट यांची ओळख आहे.
गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट 1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेच्या मोहन जोशी यांना पराभव करत त्यांनी लोकसभा गाठली होती.
