कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर डल्ला; किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर (पी एफ) डल्ला मारल्या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात लोअर परळ येथील एनएम जोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी किशोरी पेडणेकर यांच्या मालकीची आहे. किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुमारे 264 बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी रोखल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला गेला. या प्रकरणी वांद्रे येथील रहिवासी 45 वर्षीय विद्या संदीप बाबर नावाच्या तक्रारदाराने प्रथम माहिती अहवाल दाखल केला होता.अनेक कर्मचाऱ्यांचा पीएफ कापला गेला पण त्यांच्या पीएफ खात्यात कधीही तो जोडला गेला नाही, असा आरोप बाबर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

यापूर्वीही वरळीमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत लाभार्थी नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका बळकावल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर झाला होता. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावरील अडचणीत वाढ होणार आहे.किश कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे प्रशांत महेश गवस, शैला प्रशांत गवस आणि गिरीश रमेश रेवणकर अशा तीन कर्मचाऱ्यांवर पीएफ खात्यात न जमा केल्याचा आरोप आहे.