मुंबई : राज्य सरकार नपुंसक, शक्तिहीन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे विरोधक पसरवित आहेत. केवळ महाराष्ट्राला न्यायालयाने असे म्हटले, असे जे सांगत आहेत, त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे कामकाजच कळत नाही, असेच म्हणावे लागेल, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
राज्य सरकार नपुंसक, शक्तिहीन आहे. मौन बाळगायचे असेल तर मग राज्याची गरजच काय? अशा शब्दांत कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढल्याचे विरोधक पसरवित आहेत. अजित पवार, संजय राऊत आदी नेत्यांनी अशी वक्तव्य केली आहेत. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोर्टाने महाराष्ट्र सरकारबाबत हे निरीक्षण केलेले नाही. याऊलट महाराष्ट्र सरकारने मोर्चे निघाल्यानंतर काय कारवाई केली हे दाखवल्यावर कोर्टाने कुठलेही तसे वक्तव्य केलेले नाही.
फडणवीस म्हणाले, इतर राज्यांतही असे अनेक मोर्चे निघाले आहेत. मात्र, केवळ महाराष्ट्राला यावरुन टारगेट केले जात आहे, असे आम्ही सुप्रीम कोर्टात दाखवून दिले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एकंदरित सर्वच राज्यांच्या बाबतीत ताशेरे ओढणारे विधान केले. केवळ महाराष्ट्राला कोर्टाने असे म्हटले, असे जे सांगत आहेत, त्यांना सुप्रीम कोर्टाचे कामकाज कळत नाही, असेच म्हणावे लागेल.
