राजकारणातून निवृत्त होण्याचा कुठलाही विचार नाही, मीडियाने जबाबदारीने बातम्या द्याव्या. विश्वसनीयता वाढवावी, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खडसावले.
तुम्हाला शक्य झाले तर मला मते द्या. मी मागणार नाही असे नितीन गडकरी म्हटल्याचे वृत्त माध्यमात आले होते. गडकरी यांनी निवृत्तीचे संकेत यातून दिले असल्याचेही म्हटले जात होते. यावर माध्यमांना खडसावताना गडकरी म्हणाले, तुझी विश्वसनीयता वाढवायला हवी. एक माणूस त्याच्या वेबसाईटवर काहीतरी बातमी देतो आणि बाकीचे लोक त्याच्या वेबसाईटचा आधार घेतात. मी असे म्हटले की विकासाची कामे आपण केली पाहिजेत. सामाजिक, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात काम करायला हवे. मग आपल्याला केवळ निवडणुकीकरता मते मागण्याची गरज नाही. आपल्या कामाने लोक आपोआप मते देतात. त्याकरता मग मते द्या असे लोणी लावण्याची गरज नाही अशा आशयाचे मत मी मांडले होते. मी राजकारणातून निवृत्त होणार आहे असे कुठेही म्हटले नाही. पण दुर्भाग्य असे आहे ती बऱ्याच वेळा न समजता काहीतरी सनसनाटी छापले पाहिजे, म्हणून अशा बातम्या दिल्या जातात. त्याच्यातून काही वेळा गैरसमजही होतात आणि विश्वसनीयता कमी होते.
