काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे पक्ष राहुल गांधींविरोधात आक्रमक झाले आहेत. सावरकरांच्या सन्मानार्थ दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. सावरकर गौरव यात्रा आज ठाण्यात पोहोचली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या यात्रेत सहभागी झाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बातचितही केली. सावरकरांचा वारंवार अवमान करणाऱ्यांना सावरकर गौरव यात्रेतून सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. सावरकर गौरव यात्रा ही तर केवळ एक छोटीशी झलक आहे. यापुढे आम्ही सावरकरांचा अवमान सहन करणार नाही. सावरकरांवर बोलताना नेत्यांनी विचारपूर्वक बोलले पाहीजे. सावरकरांच्या गौरव यात्रेतून त्यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घरोघर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.एकनाथ शिंदे म्हणाले की, वीर सावरकरांचा अपमान देशात कोणीही सहन करणार नाही, असा संदेश या यात्रेद्वारे देत आहोत. त्याची छोटीशी झलक आज या ठाण्यातील गौरव यात्रेतून तुम्हाला दिसेल. असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.
