शिवसेनेच्या आमदारांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर खोके शब्दावरून पलटवार केला आहे. ठाकरे सरकारमध्ये तीन अपक्षांना दिलेल्या मंत्रीपदावरून सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शंकराव गडाख यांना मंत्री करण्यासाठी खोटी घेतल्याचा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय राजकारणातून राज्याच्या राजकारणात आणले असा टोला लगावात संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये 3 अपक्ष आमदारांना मंत्रिपद का देण्यात आले. यावर उद्धव ठाकरेंनी आजच्या सभेत बोलावे. आम्ही ते उद्धव ठाकरे बघितले आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. म्हणजे तेव्हा राष्ट्रीय नेतृत्व उद्धव ठाकरेंचे झाले होते. मात्र, त्यांना अजित पवार आणि नाना पटोले यांच्या लेव्हलवर आणून बसवले आहे. म्हणून शरद पवार आज नागपुरात असून सभेला आले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या या सहानुभुतीचा फायदा अजित पवार घेत असून मविआमध्ये तेच भावी मुख्यमंत्री म्हणून फिरत आहेत.
शिरसाट म्हणाले की, मविआच्या काळात बहुमत असताना शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ आमदार असताना 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदे अपक्ष आमदारांना का देण्यात आली. उद्धव ठाकरेंनी आजच्या सभेत देवाची, दिवगंत बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगावे, शंकरराव गडाख यांना मंत्री पद का दिले? त्यांनी पक्षांच्या एका तरी बैठकीला हजेरी लावली होती का? मग महेरबानी का दाखवली. त्यांना मंत्रीपद देण्यासाठी किती खोके घेतले. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्याशी उद्धव ठाकरेंनी युती केली. मात्र, आजच्या सभेत ते स्टेजवर कुठेही नाही, असे का? केवळ गरज पडेल तसे लोकांना वापरुन घ्यायचे असा त्यांचे काम आहे. ही सभा म्हणजे हतबल सभा आहे. उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते नाही तर स्टेजची पाहणी बाळासाहेब ज्यांच्याविरोधात लढले ती लोक करत असल्याचा टोलाही शिरसाठ यांनी लगावला
