9 वर्षे देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्याची डिग्री काढणे योग्य नाही; अजित पवारांचा मित्र पक्षांना घरचा आहेर

मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरुन वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या मास्टर्स शिक्षणाची पदवी बोगस असल्याचा दावा केला. यावरुन ठाकरे गटानेही आज सामनातून जोरदार टीका केली आहे. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मित्र पक्षांना घरचा आहेर दिला आहे. 2014 साली मोदींची डिग्री बघून लोकांनी निवडून दिले आहे का, डिग्रीवर काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री पाहून त्यांना कुणी मतदान केले नाही.आतापर्यंत देशाचे अनेक पंतप्रधान झाले त्यांना बहुमताचा आदर करून निवडून दिले आहे. हा प्रश्न महत्त्वाचा नाही तर वाढती महागाई आणि बेरोजगारी हा देशासमोर महत्त्वाचा प्रश्न असून त्यावर बोलायला हवे. मंत्र्यांच्या शिक्षणाबद्दल चर्चा करू नये. आपण देशाला मागे का नेत चाललोय. नरेंद्र मोदी यांनी 2014 ला स्वत:ची इमेज तयार केली. त्यांची डिग्री बघून त्यांना मतदान केले नाही. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यत त्यांनी करिश्मा तयार केला. बहुमताचा आदर करायला महत्त्व आहे. तर राज्यात 145 बहुमत असेल तर मुख्यमंत्री होता. राजकारणात डिग्रीचे असे काही नाही संबंध येत नाही.

पुणे खासदार पोटनिवडणुकीबाबत महविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. एकोप्याने जागा लढवण्याबाबत निर्णय घेऊ. आज चंद्रकांत पाटील यांचा फोन आला की ७ तारखेला श्रद्धांजली सभा आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.