आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असलेले बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा साईबाबांविरोधात मोठं वक्तव्य केलं आहे. जबलपूर येथील पानगर येथे शनिवारी आयोजित श्रीमद भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी धीरेंद्र शास्त्री लोकांशी संवाद साधत होते. यादरम्यान त्यांना साईपूजेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला. जर कोणी सिंहाची कातडी घातली तर तो सिंह होत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
याच प्रकरणी आता ठाकरे गटाचे युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. ही तक्रार मुंबईतील वांद्रे पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, बागेश्वर बाबा उर्फ पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेचं आयोजन 25 मार्च ते 31 मार्च दरम्यान मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये करण्यात आलं होतं. या चर्चेदरम्यान त्यांनी साईबाबांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आपले परात्पर गुरु शंकराचार्यांनी साईबाबांना कधीच देवाचा दर्जा दिला नसल्याचंही ते म्हणाले होते. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे पंतप्रधान असल्याचं धीरेंद्र शास्त्री यावेळी बोलताना म्हणाले होते.
