मोदींवर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं – चंद्रकांत पाटील

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांची उपरोधित स्तुती करताना भाजपला सवाल केलाय. नरेंद्र मोदी सूर्य, चंद्र आहे, धुमकेतू आहेत. मोदी हे तेजस्वी सूर्य आहेत. हा सगळा प्रकाश मोदींमुळेच पडलाय. एवढंच काय रात्रीचं शीतल चांदणंही त्यांच्यामुळेच आहे अशी उपरोधिक टीका केली होती. या टीकेवर भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे.

यावर आता भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाही. तुरुंगात जावं लागल्याने त्यांची पातळी घसरली आहे. तसेच आजही सर्वांनी मोदींना जगातील सर्वात सर्वोच्च नेते म्हणून गौरवलं आहे. भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर गेली. हे जगाला माहिती आहे. अशा माणसावर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे. अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. ते पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

चंद्रकांत पाटलांनी फडणवीस भेट देत नाही या राऊतांच्या आरोपांवरही प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. फडणवीस त्यांना उत्तर लिहिण्यास सक्षम आहेत. देवेंद्र फडणवीस कधीही कुणाला भेट देणं टाळत नाहीत. विधिमंडळाचं अधिवेशन मोठा काळ चाललं. इतिहासात पहिल्यांदा इतके दिवस अधिवेशन चाललं. त्यामुळे फडणवीसांनी व्यग्र दिनक्रमात वेळ दिला नसेल.”