देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा वेगानं फैलाव होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविड – 19 चे 3, 038 नवीन रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्हिटी दरात मोठी वाढ झाली आहे. देशात सध्याच्या घडीला कोरोना चे 21,000 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत देशात 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाने महाराष्ट्रात1 , पंजाबमध्ये 2, उत्तराखंडमध्ये 1, जम्मूमध्ये 1 आणि दिल्लीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड प्रकरणांची एकूण संख्या 4.47 कोटी (4,47,29,284) वर पोहोचली आहे. सध्या सक्रिय प्रकरणं एकूण संक्रमणांपैकी 0.05 टक्के आहेत. कोरोना आजारातून बरं झालेल्या रुग्णांची संख्या 44177204 आहे. तर, कोविड रुग्णांचा मृत्यू दर 1.19 नोंदवला गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात कोविडच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं लोकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी व्यक्त केलं.
देशात आणि राज्यात वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. केंद्राने राज्यांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि चाचण्या वाढवल्या आहेत. ऑक्सिजन बेड्स तसेच विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्यात, अशी माहिती भारती पवार यांनी दिली.
