नवी दिल्ली: ईडी (सक्तवसुली संचालनालय) आणि सीबीआय ( केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) यांच्या विरोधात चाललेल्या विरोधी पक्षांच्या कावकावीवर सर्वोच्च न्यायालयाने थेट उत्तर देत 14 विरोधी पक्षांची याचिका फेटाळून लावली आहे.
केसचा तपास आणि कोणाला अटक करायचे यासंबंधीचे अधिकार कायद्याने ईडी आणि सीबीआय या यंत्रणांना दिले आहेत. त्यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. आम्ही जनरल गाईडलाईन्स करू शकत नाही. विरोधी पक्षांच्या याचिकेवर आम्ही सुनावणी घेऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 14 विरोधी पक्षांनी तपास यंत्रणांचा (ईडी आणि सीबीआय) गैरवापर केल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर मांडताना म्हणाले होते, न्यायालयानं अटक आणि जामीन याबाबत मार्गदर्शक तत्त्वं निश्चित करावीत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना सातत्यानं लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणांचे अटक व चौकशी करण्याचे अधिकार अबाधित ठेवले आहेत.
