आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांबद्दल मी काय बोलणार; मुख्यमंत्र्यांचा आदित्य ठाकरे यांना टोला

शिवसेना मोठी करण्यासाठी माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून घरावर तुळशीपत्र ठेवले. सोन्याचा चमचा घेऊन आलेले आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांबद्दल मी काय बोलणार, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जनप्रक्षोभ मोर्चात बोलताना ठाण्यातून निवडणूक लढून जिंकून दाखवणार, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले होते. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले,लोकशाहीत कुठूनही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. शेवटी जनता ठरवत असते, कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला पाडायचे. बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून शाखाप्रमूख म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो.