मुंबई : आदित्य ठाकरेंचा जन्म झाला नव्हता, तेव्हापासून मी काम करतो आहे. विरोधकांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या. आम्ही त्याला बोलून उत्तर देणार नाही तर आमच्या कामाने उत्तर देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
अयोध्या दौऱ्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही रामलल्लाचं दर्शन घ्यायला जातो आहोत त्यातही विरोधकांना टीका करावीशी वाटते आहे तर त्यांना काही सुचेनासं झालं आहे. जे लोक कधी दिसतही नव्हते ते रस्त्यावर उतरले आहेत. हे चांगलं परिवर्तन आहे.
शिंदे म्हणाले, आपण गेल्या सात ते आठ महिन्यात राज्याच्या लोकांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. आपण चांगले निर्णय घेतल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पूर्वी कुठे दिसत नव्हते. ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत. लोकांना भेटू लागले आहेत हे चांगलं परिवर्तन आहे. काही लोकं बरेही झाले आहेत. अजित पवारांवर टीका करताना शिंदे म्हणाले, त्यांनी काही बोलूच नये. शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर ते काय देतात? मला जुन्या विषयांवर बोलायला लावू नका.
