मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात आपल्याबद्दल लिहिण्यावरून अजित पवार यांनी ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना चांगलेच सुनावले आहे. तुम्ही ज्या पक्षाचे त्याबद्दल बोला ना आमच्याबद्दल कशाला लिहिता? असा सवाल त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसविषयी सुरु असलेल्या चर्चांविषयी बोलायला आमच्या पक्षाचे प्रवक्ते समर्थ आहेत. उगाच दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी आमचे प्रवक्ते म्हणून बोलू नये. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी, आमचे वकीलपत्र त्यांनी घेऊ नये, असा टोला अजित पवार यांनी राऊतांना लगावला. उद्धव ठाकरे आणि मी नागपूरहून एकत्र आलो. सगळ्या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचे त्यांना सांगितले. तरीही ते म्हणतात मी एकटा लढायला तयार, यावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी लिहिले होते की, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा अजित पवार यांनीच करायला हवा. शिवसेनेचे 40 आमदार फोडून भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यातले 16 जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अपात्र ठरतील म्हणून सत्ता वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तेवढेच आमदार ईडी, सीबीआयच्या मदतीने फोडायचे असे कारस्थान चालले आहे. ते 16 कोण?’संजय राऊत यांनी म्हटले आहे की, भाऊबंदकी हा मानवजातीला दिलेला शाप असेल, परंतु सत्तेसाठी माणसे कोणत्या थराला जातात याचे अनेक धडे इतिहासात आणि वर्तमानातही आपण पाहत असतो. महाराष्ट्राला व मराठ्यांना दुहीचा शाप आहे व ती दुही घरातूनच सुरू होते. ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे.
मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही, असेही म्हटले होते. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही. मग जरंडेश्वर खरेदीच्या व्यवहारातील मनी लॉण्डरिंगच्या आरोपांचे काय झाले? असा सवाल करून राऊत यांनी अजित पवारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.
