‘ध चा मा’ करू नका, अजित पवारांनी माध्यमांना खडसावलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवारांनी पक्ष चिन्हाचा फोटो हटवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादीचा लोगो हटवल्याची माहिती समोर आली होती. परंतु यावर अजित पवारांनी माध्यमांना खडसावत स्पष्टीकरण दिले आहे.

माझ्या ट्विटमधून उपमुख्यमंत्री पद गेल्यावर काढलं आणि बाकीचं आहे तसेच आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. ट्विटरमधील बदल हा दीड वर्षांपूर्वीचाच होता. तुम्ही ‘ध चा मा’ करू नका. कारण जे काही झालं असेल ते मी सांगेन, दुसऱ्या कुणाची आणि ज्योतिषाचीही गरज नाही. तसेच दुसरीकडून बातम्याही काढण्याची गरज नाही. माझ्याबद्दल पक्षात कोणालाही आकस नाही, असेही अजित पवारांनी म्हंटले आहे.

माझ्याबद्दल आणि माझ्या सहकार्यांबाबत जे काही जाणीवपूर्वक बोलले जात आहे, त्यात काहीही तथ्य नाही, असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता बदलाच्या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.

चौथ्या स्तंभाने जबाबदारीचे भान ठेवावे, असं म्हणत अजित पवारांनी प्रसार माध्यमांना सुनावलं होतं. माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्रीकरुनच बातम्या दाखवण्याची सूचना त्यांनी माध्यमांना दिली होती.