भारतातील पहिलं अॅपल स्टोअर आजपासून ग्राहकांसाठी खुलं

भारतात ॲपल (Apple) चे पहिले रिटेल स्टोअर सुरू करण्यात आले आहे. ॲपलचे भारतातील पहिले स्टोअर हे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, म्हणजेच बीकेसी येथे सुरू झाले आहे. बीकेसीतील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये अॅपलचे हे पहिले अधिकृत स्टोअर आता ग्राहकांसाठी खुले झाले आहे. अॅपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक हे कालच मुंबईत आले होते आणि आज त्यांच्या हस्ते स्टोअरचे उद्घाटन पार पडले. स्टोअरचे उद्घाटन केल्यानंतर टिम कुक यांनी स्टोअरचा दरवाजा उघडत स्वतः ग्राहकांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो अॅपलचे चाहते, ग्राहक आणि अधिकारी उपस्थित होते.

परंतू आता सर्वांना प्रश्न पडला असेल की, अ‌ॅपलचे अनेक स्टोअर्स भारतात आधीच आहेत, यात नवीन काय? वास्तविक, सध्या अ‌ॅपलची उत्पादने विक्री करणारे सर्व दुकाने कंपनीचे प्रीमियम विक्रेते आहेत.प्रीमियम पुनर्विक्रेते म्हणजेच थर्ड पार्टी ज्यांनी डिव्हाइस विकण्यासाठी अ‌ॅपलकडून परवाना प्राप्त केला आहे.

बीकेसीच्या अ‍ॅपल स्टोअर मध्ये आयफोन, मॅक, आयपॅड, एअरपॉड्स, अ‍ॅपल वॉच आणि अ‍ॅपल टीव्ही उपलब्ध असणार आहे. या स्टोअर मध्ये अ‍ॅपल पिकअप सेवा देखील उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ग्राहक ऑनलाईन ऑर्डर करून वस्तू स्टोअर मधून त्यांच्या वेळेनुसार पिकअप करू शकतील.

बीकेसीच्या स्टोअर मध्ये 100 जणांची टीम काम करत आहे. 20 पेक्षा अधिक भाषा बोलणारे कर्मचारी येथे आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार बाजारात उपलब्ध असलेले चांगले प्रोडक्ट्स उपलब्ध करून मिळणार आहेत.