उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख; भाजपाचं सणसणीत प्रत्युत्तर

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (२३ एप्रिल) जळगावमधल्या पाचोऱ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. मोदींचा एकेरी उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय? उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर भारतीय जनता पार्टी संतापली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याबाबत म्हणाले, कुठे सूर्य आणि कुठे तुम्ही, बोलताना जरा तारतम्य बाळगा.

पुढे बोलताना बावनकुळे यांनी, मागेही मी सांगितलं होतं, स्वार्जनिक ठिकाणी बोलताना व्यक्तिगत टीका करू नका. त्यांनी आमच्या नेतृत्वाचा अपमान करू नये. स्फोट होतो एखाद्या दिवशी. तुम्ही आमच्या नेतृत्वाचा एकेरी उल्लेख करताय, याने एक दिवस स्फोट होऊ शकतो. मी मागेही सांगितलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगा. असंतोष कधी भडकेल हे मला माहिती नाही. यावेळी म्हटले आहे.

यावर आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. खरंतर त्यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे. १५० पेक्षा जास्त देशांनी मोदीजींना पसंती दर्शवली आहे. त्याच मोदीजींचा तुम्ही एकेरी उल्लेख केला. मोदीजींचं वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल ना तेव्हा उद्धव ठाकरे हे उडून जातील. मोदीजींचं इतकं मोठं वादळ महाराष्ट्रात येणार आहे.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वादळाला हे (उद्धव ठाकरे) घाबरतात म्हणून सतत मोदीजी – मोदीजी करून टाईमपास करत असतात. मोदीजींची उंची काय, तुमची उंची काय याचा विचार कराल का? तुमच्याजवळ दोन जण राहायला तयार नाहीत. मोदीजी जगात मान्यता मिळवतात. भारताला सर्वोत्तम करण्याचा संकल्प करतात आणि तुम्ही त्यांची खिल्ली उडवता”, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.