राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी २०२४च्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याच्या मुद्द्यावरुन सूचक वक्तव्य केलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तर आता पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांच्या विधानावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “भाजपाच्या विरोधात जे राजकीय पक्ष आहेत, त्यांना एकत्र घेऊन लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे. आमच्याबरोबर युतीत असलेल्या लोकांचे विचार वेगळे असू शकतात. मात्र, देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. देशाचं वाटोळं करण्याचं काम सुरू आहे. शेतकरी, तरुण पिढीला उद्ध्वस्त केलं जात आहे. महागाई आणि गरिबीमुळे लोक त्रस्त आहेत.” त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन भाजपविरोधात लढणार आहे’, असंही नाना पटोले म्हणाले.
दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना राऊत म्हणाले की अनेकदा पवारांच्या बोलण्याचा, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. आत्ता या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेत आहोत. तर आम्ही अद्याप एकत्र आहोत हे लोकांना सांगण्यासाठी. 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासिक सभा होणार आहे. त्या सभेला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते हजर राहतील, असं राऊत म्हणाले.
