राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही नेत्यांनी तर राज्यात येत्या १५ दिवसांत मोठा भूकंप होऊ शकतो असा दावा देखील केला आहे. दरम्यान, जपानच्या दौऱ्यानंतर विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात आगामी काळात काहीही होऊ शकतं असं सूचक विधान केलं आहे.यामुळे राज्याच्या राजकारणात पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जापान दौऱ्याहून परतल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे दिली. विधानसभेचे अध्यक्ष लवकर आल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, जपान दौऱ्यात सर्वपक्षीय लोक होते. नार्वेकर यांचा येण्याचा राजकीय घडामोडींशी संबंध नाही. त्यांनी आधीच सांगितलं होतं की ते लवकर जाणार आहेत, असे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणचं काय होणार यावर मनाची तयारी झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महाविकास आघाडीचे शरद पवार, संजय राऊत हे शिल्पकार असून त्याचे सारथ्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे .परिस्थितीनुसार आघाडी होतात व परिस्थितीनुसार त्या बदलतात आणि नवीन आघाड्या तयार होतात. त्यामुळे स्वतःची दिशा बदलण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण झाल्याचे पहावयास मिळते आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मी भाष्य करणार नाही.मात्र,’ नियती व देव ‘ठरतो त्याप्रमाणे घटना घडत असतात आणि तशाप्रकारे बदल आगामी काळात होतील.
राज्याच्या सत्तासंघर्षावरील कोर्टाच्या निर्णयाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, कोर्टाच्या निकालाबाबत खूप अनिश्चितता आहेत. काहीही होऊ शकतं. कोर्ट अध्यक्षांकडे प्रकरण सोपवू शकतं किंवा निवडणूक येईपर्यंत ताखाच पडतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. तसेच असं सुद्धा काही जणांचं म्हणणं की न्यायाधीशांना कोरोना झाला आहे, त्यामुळे निकाल लांबू शकतो. जुलैमध्ये अधिवेशन आहे, तोपर्यंत काहीही होऊ शकतं अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.
राज्यात राजकीय उलथापालथीच्या चर्चांवर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कोणीही कुठेही जाऊ शकतं. राजकारणात काहीही घडू शकतं. निवडणूक आली की गमवण्यासारखं काही नाही हे लक्षात येतं. त्यामुळे काहीही घडू शकतं असे त्या म्हणाल्या.
