उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदीबाबत केलेल्या एकेरी उल्लेखावर एकनाथ शिंदे म्हणाले की, ते वक्तव्य दुर्दैवी…

पाचोऱ्याच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून निषेध व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं नेतृत्व संपूर्ण जगात सिद्ध केलं आहे. आपली अर्थव्यवस्था मोठ्या उंचीवर नेली आहे. त्यामुळेच आपल्याला जी २० परिषदेचं अध्यक्षपद मिळालं. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. पंतप्रधानांच्या मातोश्रींचं निधन झालं तेव्हादेखील त्यांनी देशाला प्राधान्य दिलं. त्यांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध केली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य हे वैयक्तिक द्वेशातून आलं आहे. लोकप्रियतेची पोटदुखी निर्माण झाल्यावर अशा प्रकराचं वक्तव्य करण्याचं पाप काही लोक करतात. २५ वर्ष त्यांनी युतीत काम केलं. आता त्याच भाजपा नेत्याबाबत असं वक्तव्य हे निंदाजनक आहे. त्यांचं वक्तव्य ही बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती होऊ शकत नाही. सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी ते काय करू शकतात हे आधीच त्यांनी दाखवलं आहे. त्याचीच पुनरावृत्ती ते करत आहेत.