सरकारला धोका नाही; संजय राऊत यांच्या सरकार पडण्याच्या भविष्यवाणीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

खासदार संजय राऊत यांनी पुढील १५ दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडेल, त्यांचा डेथ वॉरंट निघाला आहे, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी, सरकारमधील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तरी सध्या त्यांच्याकडे १६५ असा बहुमताचा आकडा असल्यामुळे माझ्या मते सध्या तरी सरकारला धोका नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई झाल्यास नवीन मुख्यमंत्री राज्याला प्राप्त होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांचा दावा अभ्यासातून आला असेल असा अंदाज आधी भुजबळ यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘ संजय राऊत आतील गोटात काम करतात. दिल्लीत असतात. संपादक आहेत.त्यामुळे त्यांच्याकडे माहिती असेल पण माझ्याकडे तर माहिती नाही. मुख्यमंत्री बदलणार वगैरे अशी परिस्थिती नाही.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आगामी राजकीय गणितं अवलंबून आहेत, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं. ते म्हणाले, ‘ १६ आमदारांची सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध निकाल जाईल. शिंदे साहेब त्यात आहेत. ते मुख्यमंत्रीपदावरून गेले तर दुसरा मुख्यमंत्री येईल. पण जर तरच्या गोष्टी आहेत. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच याची काय खात्री आहे? दुसरं म्हणजे, निकाल आलाच तर मुख्यमंत्रीपद गेलं तरी सरकार हे 165 आमदारांचा पाठिंबा आहे. 16 गेले तरी 149 आमदार शिल्लक राहतात. सरकार त्यांचंच राहील.मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती बदलू शकते. पण सरकार बदलणार नाही, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय.

वज्रमूठ सभांच्या माध्यमातून आपण मविआचे प्रवक्तेपद मिळविण्याचा प्रयत्न करीत आहात, या मंत्री उदय सावंत यांच्या अरोपाबाबत भुजबळ म्हणाले, पहिले तर ते पद रिक्त नाही, त्यावर संजय राऊत भक्कमपणे आरूढ आहेत आणि मी यापूर्वी कधीही कोणत्याही पक्षात प्रवक्ते पदावर राहिलेलो नाही. त्यामुळे माझी अशी कोणतीही इच्छा नाही. असंही भुजबळ म्हणाले.