जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार; सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार का याची चर्चा राज्यातील राजकारणात रंगली आहे. अजित पवार यांची सासरवाडी धाराशिव जिल्ह्यातील ‘तेर’मध्ये आहे. तिथे अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर झळकले आहेत. तेर गावातील चौकाचौकात “तेरचे जावई ,आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार,” अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे घातले आहे. आज सकाळी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. सासरवाडीत झळकलेल्या या पोस्टरची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.

राज्यात राजकीय भूकंप होणार अशा चर्चा गेल्या आठवड्यात रंगल्या होत्या. अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेनंतर त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. तसंच जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीबरोबर राहणार आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं.दरम्यान, एका मुलाखतीत अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अजित पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवताना म्हटलं होतं की, होय 100 टक्के आवडेल. तसंच 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा दावा ठोकणार का या प्रश्नावरही 2024ला काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार असल्याचं अजित पवार म्हणाले होते.

अजित पवार यांची सासरवाडी धाराशिव जिल्ह्यातील ‘तेर’मध्ये आहे. जिथे हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच ते बॅनर्स लावल्याचं स्पष्ट आहे. कारण सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना अजितदादांनी मुख्यमंत्री होण्याबाबत साकडं घातलं आहे. अजितदादांनी मुख्यमंत्री होण्याची ग्रामस्थांची मनोमन इच्छा आहे. गावातील चौकाचौकात बॅनर्स लागले आहेत. ‘तेरचे जावई, आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार’ असा मजकूर या बॅनर्सवर आहे.