सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्र जेव्हा कोविडच्या संकटामुळे हैराण झालेल होता. लोकांचे जीव धोक्यात होते. तेव्हा स्वतःच्या जीवाची काळजी करत संपूर्ण अडीच वर्ष फेसबुक लाईव्ह वरून प्रशासन चालवणाऱ्या या घर कोंबड्याने आम्हाला शिकवू नये. जनतेची सेवा कशी करायची असते, असा हल्लाबोल शिवसेनेच्या नवनियुक्त प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना वाघमारे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकरी पुत्र आहेत.संघर्षातून उभे राहिलेले त्यांचे व्यक्तिमत्व आहे. थेट जनतेशी संपर्क साधून अठरा-आठरा तास काम करून ते जनतेचे अश्रू पूसत आहेत. त्यामुळे या घर कोंबड्याने आम्हाला शिकवू नये की प्रशासन कसे चालवायचे किंवा लोकांची सेवा कशी करायची.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला बायकांच्या नळावरील भांडणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे अशी टीका करताना वाघमारे म्हणाल्या, कालच्या पाचोऱ्याच्या सभेत ठाकरेंनी बहिणाबाईची कविता कोट केली. “इमानाले विसरला त्याला नेक म्हणू नये, जन्मदात्याने विसरला त्याला लेक म्हणू नये”. उद्धव ठाकरे हे आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून बोलताय का? कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना बांधली ती या मावळ्यांच्या, शिवसैनिकांच्या, शिलेदारांच्या, कष्टातून. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे साहेबांची प्रेरणा त्यांच्या पाठीमागे होती. त्यामुळे त्यांना मला एकच ठणकावून सांगायचं आहे, ज्या वेळेस उद्धव ठाकरे हेलिकॉप्टर मध्ये बसून प्राण्यांचे फोटो काढत होते. त्यावेळेस एकनाथ शिंदे हे लोकांचे अश्रू पुसत होते. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या रक्ताचे वारसदार असू शकतात. संपत्तीचे वारसदार असू शकतात. पण एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान झालेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावी अशी मागणी करणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर वाघमारे यांनी टीका केली. त्या म्हणाल्या, 2009 -10 साली प्रणिती शिंदे आमदार होत्या आणि सोलापूरच्या दूषित पाण्यामुळे 20 ते 21 लोकांचे जीव गेलेले होते. त्यावेळेस त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण होतं ? की मग तुमच्या काळात घडलं तर प्रशासन जबाबदार. त्यावेळेस तुम्ही दिला होता का राजीनामा ? मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हा प्रकार त्यांनी आता बंद करावा. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही प्रवृत्ती आता त्यांनी करू नये.
