राज्यात एकिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पद कधीही जाणार असे दावे केले जात आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचं बारीक लक्ष आहे. शिवसेनेच्या आमदाराने तर अजित पवार यांच्या विरोधी पक्षनेते पदाचं जणू काऊंटडाऊन सुरुच झालंय, असा दावा केलाय. 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे.मात्र या सभेला अजित पवार नसतील, असा खळबळजनक दावा करण्यात आलाय. संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी हा दावा केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.अजित पवार लवकरच सरकारमध्ये सहभागी होणार आहेत, असं देखील संजय शिरसाट यावेळी म्हणाले.
त्यातच सुप्रीम कोर्टाकडून सत्तासंघर्षांवर कधीही निकाल येऊ शकतो. त्यातच मुख्यमंत्री 3 दिवस सुटीवर गेल्याने या चर्चांना जास्त महत्त्व आले आहे. यामुळे मविआच्या वज्रमूठ सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, खासदार संजय राऊत यांनी दम असेल तर उद्धव ठाकरेंची सभा कर्नाटकात घेऊन दाखवावी. कर्नाटक निवडणुकीवरुन राजकारण तापलेले असताना राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून कर्नाटकात निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावरुन संजय शिरसाट यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
आमदार संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगलीनंतर पोलिस आयुक्त यांची बदली झाली, याचे श्रेय विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाही. हा त्यांचा केवळ इम्प्रेशन दाखवण्याचा प्रकार आहे, असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
