सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वर्षभरापूर्वी वीर सावरकर महान असल्याचा गौरव केला होता. मात्र त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी मात्र सावरकरांवर टीका केली आहे. सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, वीर सावरकरांबद्दल मलाही आदर होता. पण ज्यावेळी मी त्यांनी लिहिलेले सहा सोनेरी पाने हे पुस्तक वाचले, त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मला शंका निर्माण झाली आहे.
हा देश पुढची हजार वर्षे गांधी – नेहरूंचाच राहील. मोदींनी कितीही प्रयत्न केले तरी तो कधीच मोदी – सावरकरांचा होणार नाही. शिंदे म्हणाल्या, सावरकरांबद्दल माझ्या मनातही आदर होता. मात्र, त्यांचे सहा सोनेरी पाने हे पुस्तक वाचल्यानंतर आपण सगळे शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानता. त्यांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकरांनी महाराजांबाबत अपमान केला आहे.एवढचं नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द लिहिले आहेत. आणि जेंव्हा मी हे पुस्तक वाचले तेंव्हा माझ्या मनात सावरकरांबाबत शंका निर्माण झाली.
देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्यानंतर राहुल गांधींनी आपली खासदारकी गमावली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी आपले नाव गांधी आहे. सावरकर नाही. त्यामुळे आपण माफी मागणार नाही, असे एका पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड वाद उफाळला आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी राहुल गांधींना सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर पाठवले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सावरकरांच्या सहा सोनेरी पान या पुस्तकावरून टीका करत पुन्हा आपला सावरकर द्वेष दाखवून दिला आहे.
विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच प्रणिती यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांनी सावरकरांचा महान म्हणून गौरव केला होता. एबीपी माझा कट्टा या कार्यक्रमात ते म्हणाले होते की सावरकर एव्हढे महान व्यक्ती होते की त्यांनी एका स्वीपरच्या हातून पतित पावन मंदिराची पायाभरणी करून घेतली. त्यांनी अस्पृश्यता निवारण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. याच कार्यक्रमात ते म्हणाले होते की नागपूर येथे वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आपण माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या सोबत एका कार्यक्रमात केले होते.
सौजन्य : एबीपी माझा
सुशील कुमार शिंदे यांची सावरकरांबद्दल ही भूमिका असताना त्यांच्या कन्येने मात्र टीका केली. यापूर्वीही काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांची कन्या आणि युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांवर टीका केली होती. शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या होत्या की, “बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, अशा विचारांचं सावरकरांनी समर्थन केलं. बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांविरोधात वापरलं पाहिजे. या विचारांचे ते समर्थन करतात. मग माझ्यासारख्या महिला भगिनींना कसं सेफ वाटेल.
