‘बारसू’बाबतची ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका उघड – उद्योगमंत्री उदय सामंत

ज्यांना बारसू प्रकल्पाला विराेध करायचा आहे. ज्यांना सर्वेक्षण थांबवायचे आहे त्यांनी प्रसारमाध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट करावी, जनतेपुढे त्यांनी हा उद्याेग आम्ही घालवत आहाेत अशी त्यांची भूमिका सांगितल्यास सर्व काही स्पष्ट हाेईल असे मत उद्याेगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बारसू प्रकल्पाच्या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बाेलताना सांगितले. दरम्यान सामंत यांनी सध्या या प्रकल्पाविषयी ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका उघड झाल्याचेही स्पष्ट केले.

रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे गटाचे जे काही मनसुबे होते ते उधळले गेले आहेत. त्यामुळेच रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होत आहे, असा आरोपही उदय सामंत यांनी केला. ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचीदेखील आज दुपारी बारसू रिफायरीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद होत आहे. उदय सामंतांच्या दाव्यावर उद्धव ठाकरे काय उत्तर देणार?, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

उदय सामंत म्हणाले, रत्नागिरीतील ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे. मात्र, ठाकरे गटाचे दुसरे नेते संजय राऊत प्रकल्पाला विरोध करत आहेत. ठाकरे गटाची ही दुटप्पी भूमिका आहे. ठाकरे गट केवळ आपल्या स्वार्थासाठी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे.

उदय सामंत म्हणाले, बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला काही जणांचा विरोध असला तरी या प्रकल्पाला अनेकांचे समर्थनही आहे. मात्र, प्रसारमाध्यमे केवळ विरोधकांच्याच बातम्या दाखवत आहेत. या प्रकल्पामुळे कोकणात रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्राच्या हिताचा हा प्रकल्प आहे. त्यामुळेच हा प्रकल्प व्हावा, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. बारसूत रिफायनरी व्हावा, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला पत्र लिहिलेले नाही तर उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र लिहिले आहे. असं उदय सामंत म्हणाले.