चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या बैठकीला अजित पवारांची गैरहजेरी

पुण्यातील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दांडी मारली आहे. बैठकीची वेळ पुढे ढकलल्याने अजित पवार यांनी या कालवा समितीच्या बैठकीला न येण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील आमदार पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील शासकीय विश्रामगृहात बैठक होती. पुण्याच्या पाणी कपातीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपण 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काय तर आताच मुख्यमंत्री पदासाठी दावा करु शकतो, असं मोठं वक्तव्य नुकतेच केले होते. त्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले.

बुधवारी पुणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक आयोजित केलेली होती. पुण्याच्या आसपास असणाऱ्या धरणांमद्धे जुलै महिन्यांपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घ्यावा का? यासंबधीची चर्चा या कालवा समितीच्या बैठकीत होणार होती. अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित राहणार होते.

पुणेकरांच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्वाची बैठक आहे. पुणे शहर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरण क्षेत्रामध्ये कमी पाणीसाठा आहे. शहरात वेळ पडली तर पाणीकपात करावी का यावर चर्चा होणार होती. यासाठी अजित पवार अनुपस्थित आहेत. कारण या बैठकीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.