ठाकरे गटातील 13 आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात – उदय सामंत

राज्यातील राजकारणात काय होईल, याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. रोज वेगवेगळ्या राजकीय चर्चा झडत आहेत. आता तर ठाकरे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी महाबळेश्वर येथे भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे आता नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगत असताना उदय सामंत यांनी नव्या चर्चेबाबत विधान केल्याने येत्या काळात राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार अशी चर्चा रंगली आहे.

उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटातील उरलेले 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत अशा अनेक चर्चा सुरू आहेत, असं उदय सामंत म्हणाले. खारघर घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवलं जाईल अशी चर्चा सध्या सुरू आहे, याबाबत प्रश्न विचारला असता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. तसेच, यावेळी उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणाही साधला आहे.

संजय राऊत हे जगातील सगळ्यात शहाणे आणि विद्वान आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणं मी आता सोडून दिलेलं आहे. त्यांच्या समोर स्पर्धक म्हणून जगात एकही विद्वान शिल्लक राहिला नाही. देशातील सगळ्या विद्वानांचे राऊत हे महामेरू बनलेले आहेत. जगातील विद्वानांपेक्षा राऊत यांना जास्त अक्कल आहे, त्यांच्यावर काय बोलायचं? अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी सरकारी कागद दाखवून शहाणपणा दाखवू नये, अशी टीका उदय सामंत यांच्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलं आहे.