ठाण्यातही उभे राहणार मुख्यमंत्री कार्यालय

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे शहर चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा ठाणे शहर चर्चेत आले आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कशिश पार्क येथे नवं मुख्यमंत्री कार्यालय होणार आहे. याशिवाय आयुक्त कार्यालय आणि शासकीय कृषी विभागाचे कार्यालय देखील येथे उभारण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान ठाण्यात असल्यामुळे सध्या ठाणे शहर राज्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेने कशीश पार्क येथील महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांसाठी कार्यालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मजल्यावर ठाणे महापालिका आयुक्तांसाठीही दालन तयार करण्यात येणार असल्यामुळे या भागातून मुख्यमंत्री ठाणे महापालिकेच्या कारभारावरही लक्ष ठेवण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

क्लस्टर योजनेसाठी कशीश पार्क येथील इमारत वापरण्यात येत असून कृषी विभागाचे कार्यालयही याच इमारतीच्या सातव्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी विभागासह मुख्यमंत्री आणि आयुक्त दालनाची निर्मिती करणे, विद्युतीकरण आणि संगणक जोडणीच्या कामांसाठी ठाणे महापालिकेने चार कोटी ६० लाखांची निविदाप्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. ठाणे शहरातील राजकारणातून उदयाला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्ह्यातील बहुसंख्य महापालिकांवर आणि तेथील राजकारणावर मोठी पकड आहे. शिवसेनेने ठाणे महापालिकेवर एकहाती सत्ता राखली असल्यामुळे राज्याच्या सत्तासंघर्षाच्या काळातही एकनाथ शिंदे यांना मोठी रसद पोहोचवण्यात आली होती. शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अधिकारी वर्ग यांच्यासह शहरातील महत्त्वाच्या वास्तूंमधूनही कामकाज चालवण्यात येत आहे.

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. विविध महत्त्वाचे प्रकल्प प्रत्यक्षात आणायचे आहेत. मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांचे कार्यालय एकाच मजल्यावर असणार आहे. अशा स्थितीत महापालिकेच्या कारभारावर शिंदे यांची पकड कायम राहणार आहे. त्याचा फायदा त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत मिळू शकेल, अशी चर्चा आहे.